सुरेश तिवारी उत्तर प्रदेशातील आमदार, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरीने प्रयत्न करत आहे. ३ मे पर्यंत संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आलेलं आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता करोनाचा प्रादूर्भाव जास्त असलेल्या भागांमध्ये हे लॉकडाउन आणखी वाढवलं जाण्याचे संकेतही मिळत आहेत. सध्याच्या खडतर काळात प्रत्येक व्यक्तीने घरात राहून सरकारी यंत्रणांना मदत करावी असं आवाहन सरकार करत आहे. सोशल मीडियावरुन पसरवण्यात येणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही सरकार करतंय. परंतू काही भागांमध्ये लोकप्रतिनीधीच द्वेषपूर्ण वक्तव्य करत असल्याचं समोर आलंय. उत्तर प्रदेशातील भाजप आमदार सुरेश तिवारी यांनी मुस्लीम व्यक्तीकडून भाजी खरेदी करु नका असं आवाहन केलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सुरेश तिवारी देवरिया जिल्ह्यातील बरहज विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. "सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सर्वांना खुलेआम सांगतो आहे. मुस्लीम व्यक्तीकडून कोणीही भाजीपाला खरेदी करु नका." काही सरकारी अधिकारी व नागरिकांच्या उपस्थितीत अशा प्रकारचं वक्तव्य करतानाचा तिवारी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंडियन एक्स्प्रेसने या व्हिडीओसंदर्भात तिवारी यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
"हे वक्तव्य मी गेल्या आठवड्यात केलं होतं. माझ्याकडे काही लोकांनी तक्रारी केल्या होत्या की काही भाजीवाले हे आपल्या मालावर थुंकी लावून तो विकत आहेत. सध्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता मी लोकांना त्यांच्याकडून भाजी विकत घेऊ नका असं आवाहन केलं. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर लोकांना योग्य वाटतं ते त्यांनी करावं." तिवारी यांनी आपली बाजू मांडली. मी लोकांना फक्त सल्ला दिला होता, त्याचं पालन करायचं की नाही हा संपूर्ण त्यांचा निर्णय आहे. जमातच्या कार्यक्रमामुळे देशातील काही भागात निर्माण झालेली परिस्थिती आपण सर्वांनी पाहिली आहे. राज्य भाजप प्रवक्त्यांनी मात्र सुरेश तिवारी यांनी केलेलं वक्तव्य हे वैय्यक्तिक असून ती पक्षाची भूमिका नसल्याचं स्पष्ट केलं आहे.